
धुळे (प्रतिनिधी) आताची वेळ संवेदनशीलतेची वेळ आहे, शोक करण्याची वेळ आहे. मात्र, आता मी हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आश्वासन देतो की, हुतात्मा जवानांनी जे रक्त सांडले आहे, त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाणार आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) येथे केले.

येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुलवामा येथे दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, भारतीयाची एक निती आहे, आम्ही कोणाला डिवचत नाही. मात्र, आम्हाला डिवचले की, आम्ही कोणाला सोडणार नाही. यापूर्वी आपल्या भारतीय सुरक्षा दलातील जवानांनी करुन दाखवले आहे. त्यामुळे आताही पुन्हा दाखवून देणार आहे. जवानांनी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्येक अश्रूंचा बदला घेतला जाईल. आपल्या देशातील लष्कराबद्दल मला गर्व आहे. सीआरपीएफमध्ये या घटनेवरून संताप वाढला असून आम्ही सुरक्षा रक्षकांना बदल घेण्याची खुली सूट दिली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. सुरुवातीलाच मोदी यांनी खानदेशी अहिराणी भाषेत भाषणाला सुरुवात करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल आदी मान्यवर उपस्थित होते.


