नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असून त्यापूर्वी ३० डिसेंबरला येथील विमानतळाचेही उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर मोदी अयोध्येत रोड शो घेणार असून नंतर एक सभाही घेणार आहेत.
राम मंदिराचे उद्घाटन पुढील वर्षी २२ जानेवारीला होणार आहे. त्यासाठी अयोध्येचाही कायापालट करण्यात आला आहे. अयोध्येत नवीन विमानतळ उभारण्यात आले असून रेल्वेस्थानकाचाही पुनर्विकास करण्यात आला आहे. मोदी हे ३० डिसेंबरला अयोध्येत येणार असून यावेळी ते विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांचे उद्घाटन करतील. विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांच्यातील अंतर १५ किलोमीटरचे आहे.
विमानतळावरील कार्यक्रम झाल्यावर पंतप्रधान मोदी याच मार्गावरून रोड शो करत रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचणार असल्याची माहिती अयोध्येचे जिल्हा न्यायदंडाधिकारी नितीशकुमार यांनी सांगितले. रोड शोच्या मार्गावर विविध ५१ ठिकाणी मंडप उभारून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी विविध साधूसंत पंतप्रधानांना आशीर्वाद देतील. रेल्वे स्थानक ते विमानतळ या मार्गावरील पाच किलोमीटरच्या उड्डाणपूलाचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होईल.
रेल्वे स्थानकावर मोदींच्या हस्ते वंदे भारत आणि अमृत भारत या दोन रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. यानंतर मोदी पुन्हा रस्ते मार्गाने विमानतळावर जाणार असून विमानतळाच्या नजीकच आयोजित केलेल्या सभेत सहभाग घेणार आहेत. अयोध्येसाठीचे पहिले विमान दिल्लीहून सकाळी दहा वाजता उड्डाण करून अयोध्येत सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.