नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारत 15 ऑगस्ट रोजी आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा देशवासीयांना संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्यदिनादिवशी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करण्याची ही अकरावी वेळ असेल. सलग ११ वेळा देशाला संबोधित करणारे जवाहरलाल नेहरू यांच्या नंतरचे ते दुसरे पंतप्रधान असतील, तर 11 वेळा स्वातंत्र्यदिनाचे भाषण देणारे ते तिसरे पंतप्रधान असतील.
यंदाच्या स्वातंत्रदिनाच्या आपल्या भाषणात पीएम मोदी देशासमोर सरकारचे प्राधान्यक्रम मांडू शकतात, तसेच भारताला विकसित देश बनवण्याचा रोड मॅपही देऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनासाठी गरीब, तरुण, शेतकरी आणि महिला या चार वर्गांच्या प्रतिनिधींना खास आमंत्रित करण्यात आले असून, हे सर्व लोक लाल किल्ल्यावर उपस्थित राहणार आहेत. या चार श्रेणीतील सुमारे चार हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पाहुण्यांची 11 श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. शेतकरी, तरुण आणि महिला पाहुण्यांना आमंत्रित करण्याची जबाबदारी कृषी आणि शेतकरी कल्याण, युवा कार्य, महिला आणि बालविकास मंत्रालयांना देण्यात आली आहे.