बारामती (वृत्तसंस्था) संपूर्ण देश शहीदांच्या पाठीशी उभा आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही, मात्र देशाचे संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपयश आल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लष्कराच्या जवानांवर झालेला हल्ला चिंतेची बाब आहे. ज्या मार्गावर हा दहशतवादी हल्ला झाला, तो परिसर तुलनात्मकरित्या सुरक्षित आहे. मात्र या मार्गावरुन सीआरपीएफच्या जवानांचा ताफा जाणार आहे, याची माहिती दहशतवाद्यांना आधीच मिळाली असावी आणि ही चिंतेची बाब आहे. तसेच एवढा मोठा ताफा जात असताना सुरक्षेची किती खबरदारी घेतली होती, याबाबतही या घटनेमुळे शंका उपस्थित केली जात आहे.
पुलवामामधील हल्ला हा देशावरील हल्ला आहे. त्यामुळे यावर राजकारण करण्याची ही वेळ नाही. सध्या सत्तेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर नसताना मागील सरकारवर दहशतवादी हल्ल्यांवरुन सडकून टीका केली होती. दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी 56 इंच छाती हवी अशा शब्दात नरेंद्र मोदींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती, याची आठवण शरद पवार यांनी करुन दिली.नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेप्रमाणे आम्ही टीका करणार नाही. सध्याची स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत शहीद आणि जखमी जवानांच्या कुटुंबियांच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे शरद पवारांनी यावेळी म्हटले.