दिल्ली-वृत्तसेवा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आयोजित १८व्या व्हर्च्युअल रोजगार मेळाव्यात देशभरातील सुमारे ६१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. या नियुक्त्या गृह मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, उच्च शिक्षण विभाग तसेच इतर विविध केंद्रीय विभागांमध्ये करण्यात आल्या. देशातील ४५ ठिकाणी एकाच वेळी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते.

व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून देणे हा सरकारचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. देशातील महिलादेखील मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप्सचे नेतृत्व करत असून उद्योजकतेत त्यांचा सहभाग झपाट्याने वाढत आहे. महिला स्वयंरोजगाराचा दर १५ टक्क्यांनी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.

याआधीचा रोजगार मेळावा ऑक्टोबर २०२५ मध्ये झाला होता. १७व्या रोजगार मेळ्यात नियुक्तीपत्रे देताना पंतप्रधानांनी ही केवळ सरकारी नोकरी नसून राष्ट्रसेवेची संधी असल्याचे सांगितले होते. भारत हा जगातील सर्वात तरुण देश असून युवा शक्तीला सरकार मोठी ताकद मानते, असे त्यांनी अधोरेखित केले होते. प्रत्येक क्षेत्रात सरकारचा दृष्टिकोन हा तरुणांच्या क्षमतेवर आधारित असून परराष्ट्र धोरणातही युवांच्या हितांचा विचार केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले.
रोजगार मेळ्यांची ही मालिका पंतप्रधानांनी २२ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू केली होती. २०२३ अखेरपर्यंत १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. नोव्हेंबर २०२३ पर्यंत ११ रोजगार मेळ्यांद्वारे ७ लाखांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. पुढे २०२५ मध्ये ११ लाखांचा टप्पा गाठण्यात आला. लोकसभा निवडणुकीपूर्वी १२ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या १२व्या रोजगार मेळ्यात सर्वाधिक १ लाख नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले होते.
या उपक्रमासोबतच ‘प्रतिभा सेतू’ या पोर्टलचाही उल्लेख पंतप्रधानांनी केला. यूपीएससीच्या अंतिम यादीपर्यंत पोहोचूनही निवड न झालेल्या उमेदवारांची क्षमता व मेहनत वाया जाऊ नये यासाठी हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील संस्था अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावू शकतात आणि रोजगाराच्या संधी देऊ शकतात. युवा प्रतिभेचा योग्य उपयोग करून भारताची युवा शक्ती जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. सरकारच्या या रोजगार उपक्रमामुळे देशातील तरुणांना स्थैर्य, संधी आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचा मार्ग उपलब्ध होत असल्याचे चित्र या मेळाव्यांमधून दिसत आहे.



