दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी केली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त असून उमेदवारांची घोषणाही करत आहेत. जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.
काँग्रेसपाठोपाठ आता भाजपनेही आपल्या बड्या नेत्यांना येथे निवडणूक प्रचारात उतरवण्याची योजना आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीत प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे. १४ सप्टेंबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये विविध निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या प्रमुख रॅलींसह भाजपच्या निवडणूक प्रचाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ६ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र प्रसिद्ध केले आहे. संकल्पपत्र प्रसिद्ध केल्यानंतर अमित शाह यांनी भाजप नेत्यांची बैठक घेतली. तसेच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मूमध्ये रॅलीही घेतली. यानंतर दुस-या दिवशी ७ सप्टेंबरला अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दहशतवाद, पाकिस्तान आणि विरोधी पक्षांवरही जोरदार हल्लाबोल केला.
भाजपने गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये ४० नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व नेत्यांचा लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक प्रचार सुरू होणार आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांसारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांच्या काही मुख्यमंत्र्यांचाही या यादीत समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांमध्ये मनोहर लाल खट्टर, जी किशन रेड्डी, शिवराज सिंह चौहान आणि डॉ. जितेंद्र सिंह अशी नावे आहेत.