हैदराबाद वृत्तसंस्था । कोरोनावरील प्रतिकारात उपयुक्त ठरणारी स्फुटनीक ही रशियातील लस भारतीय ग्राहकांना ९९५ रूपयात मिळणार असल्याची माहिती आज रेड्डीज लॅबोरेटरी या कंपनीने जाहीर केली आहे.
काही दिवसांपूर्वीच रशियाच्या स्फुटनीक व्ही या लसीला भारतात विक्रीसाठी परवानगी मिळाली होती. भारतात रेड्डीज लॅबोरेटरी या ख्यातनाम कंपनीला याच्या विक्रीचे अधिकार मिळणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. यामुळे ही लस नेमकी केव्हा उपलब्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमिवर, आज रेड्डीज लॅबोरेटरी या कंपनीने स्फुटनीक V लसीचे दर जाहीर केले आहेत.
या लसची किंमत 948 रुपये असेल. मात्र त्यावर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे या लसीसाठी एकूण 995 रुपये मोजावे लागणार आहेत. या लसीचेही दोन डोस घेणं बंधनकारक आहे. या डोसला सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीजकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.