वॉशिंग्टन वृतसेवा | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा काश्मीरच्या मुद्यावर मध्यस्थतेबद्दलचा प्रास्तव हा खूपच बालिश आणि लज्जास्पद असल्याचे मत अमेरिकेचे खासदार ब्रॅड शरमन यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या या चुकीबद्दल वॉशिंग्टनमधील भारताचे राजदूत हर्ष वर्धन श्रृंगला यांच्याकडे माफी मागितली आहे.
कॅलिफोर्नियाच्या सॅन फर्नाडो व्हॅलीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शरमन यांच्या म्हणण्यानुसार, ‘भारतानं काश्मीरच्या मुद्यावर तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थतेचा नेहमीच विरोध केलाय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांना मध्यस्थतेबद्दल विनंती केली असेल असं वाटत नाही’ असं म्हटलंय. ‘दक्षिण आशियाच्या परराष्ट्र नीतींबद्दल ज्याचा अभ्यास असेल त्याला हे माहीत असेल की, भारतानं नेहमीच काश्मीरच्या मुद्यावर कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नाकारलाय. प्रत्येकाला माहीत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रकारचा प्रस्ताव कधीही ठेवणार नाहीत. ट्रम्प यांचा हा दावा भ्रामक आणि लज्जास्पद आहे’ असंही शरमन यांनी म्हटलंय. दरम्यान, काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी भारताने कोणतीही भूमिका मांडलेली नाही, असं परराष्ट्रखात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्ट केलंय.