दिल्ली वृत्तसंस्था । वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि कर्णधार ब्रायन लारा यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटण्यासाठी लारा राष्ट्रपती भवनात गेले आणि नंतर या भेटीचा एक जबरदस्त फोटो राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही पोस्ट करण्यात आला.
वेस्ट इंडीजचा महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा हा सध्या भारतात आहे. विंडीजचा संघ भारताविरूद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेदरम्यान समालोचक आणि एक्सपर्ट अशा भूमिका लारा बजावत आहे. महान क्रिकेटपटू आणि आधुनिक युगातील उत्तम फलंदाज असलेल्या ब्रायन लाराने आज राष्ट्रपती भवन येथे कोविंद यांची भेट घेतली. उदयोन्मुख खेळाडू आणि क्रिकेटपटू यांचा लारा हा आदर्श आहे. त्याचे क्रिकेटमधील योगदान मोठे आहे, असे या भेटीच्या वेळी राष्ट्रपती कोविंद म्हणाले.