अमळनेर (प्रतिनिधी) जास्त पैसे खर्च करायला लागू नये म्हणून गुणवत्तेच्या नावाखाली शिक्षण क्षेत्रात बदल करून गुंतागुंत निर्माण करण्यास भाजपच नव्हे तर काँग्रेसही तेवढीच जबाबदार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांनी ग्रेटर खान्देश अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींच्या आज (दि.६) येथील गंगाराम सखाराम हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या बैठकीत केले .
शिक्षण क्षेत्रातील समस्या, नवनवीन बदलाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या अडचणी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धुळे येथे खान्देशस्तरीय ग्रेटर खान्देश अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून संस्थाचालक व विविध कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. श्री.पाटील पुढे म्हणाले की, शासनाने शिक्षण क्षेत्रातील खर्च कमी करण्यासाठी अनुदान बंद करण्याच्या सूचना दिल्या आणि त्याच्यातून शिक्षण सेवक संकल्पना पुढे आली. लिपिक, शिपाई भरतीला स्थगिती आली, नंतर संस्थाचालक कर्मचारी भरताना पैसे घेतात म्हणून गुणवत्तेवर आधारित भरती करायची म्हणून पवित्र पोर्टल आले. त्यामुळे गुणवत्ता वाढीऐवजी गुंतागुंतच वाढली. त्यासाठी सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा संयुक्त लढा उभारण्यासाठी ग्रेटर खान्देश अधिवेशन बोलवायचे आहे. त्यात प्रामुख्याने शिक्षणाचा खर्च वाढवा, वेतनेतर अनुदान वाढवा, दोन वर्षांपासून स्थगित भरती संस्थेला करू द्या, यासह इतर मागण्यांचे ठराव करण्यात येणार आहेत. शिक्षकांच्या शालार्थ व जुनी पेन्शन योजनेबाबत संस्थाचालक संघटना कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी खा.शि. मंडळाचे माजी चेअरमन नीरज अग्रवाल म्हणाले की, जोपर्यंत भरतीला परवानगी मिळत नाही, तोपर्यंत महाविद्यालयांप्रमाणे कंत्राटी शिक्षक भरती करण्याची मंजुरी दिली पाहिजे. संचालक योगेश मुंदडा म्हणाले की, सर्व संस्था चालकांनी एकत्रित येऊन संस्था सरकारकडे जमा करून सरकारला अडचणीत आणावे. मारवडचे संस्थाचालक जयवंत पाटील म्हणाले की, शिक्षण विभागातील काही संस्थाचालक, मुख्याध्यापक व संघटना पदाधिकारी दलाल असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून अडचणी अधिकच वाढल्या आहेत. शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष आर.जे. पाटील म्हणाले की, संस्थाचालकांनी संस्थेसाठी लढा देताना कर्मचाऱ्याला ही न्याय मिळवून देण्याची भूमिका ठेवल्यास संस्थाचालक व कर्मचारी यांचायतील विळा भोपळाचे नाते सुधारेल. टी.डी.एफ.चे अध्यक्ष सुशील भदाणे यांनी काही समस्या कृत्रिमरित्या निर्माण करून त्या तांत्रिक दाखवल्या जातात, असे निदर्शनास आणून दिले. माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी जोपर्यंत संस्थाचालक व कर्मचारी संयुक्तरित्या शासनाविरुद्ध कठोर पावले उचलत नाहीत, तोपर्यंत शासन न्याय देऊच शकत नाही, हे सोदाहरण स्पष्ट केले. भागवत पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष एम. ए. पाटील, हरी भिका वाणी, जितेंद्र जैन, नीरज अग्रवाल, योगेश मुंदडा उपस्थित होते.
बैठकीस अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, मंगरूळ संस्थेचे श्रीकांत पाटील, भरवस संस्थेचे विजय सोनवणे, झाडी संस्थेचे धनगर पाटील, अंतुर्ली संस्थेचे रवींद्र पाटील, शिवाजी हायस्कूल चे कैलास पाटील, गडखम्ब संस्थेचे बापूराव पाटील, माधुरी पाटील, वसुंधरा लांडगे, कमल कोचर, एच एस पाटील, गणेश पाटील, मुख्याध्यापक के. डी. सोनवणे यांच्यासह अनेक संस्थाचालक व कर्मचारी प्रतिनिधी हजर होते. सूत्रसंचालन उमेश काटे यांनी केले तर आभार नीरज अग्रवाल यांनी मानले.