यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री बालाजी रथोत्सवाचे आयोजन येत्या शनिवार, दिनांक १२ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, नगरपरिषदेने रथ मार्गाचे डांबरीकरण करून भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार रथ मिरवणुकीचा मार्ग डांबरीकरण करून स्वच्छ करण्यात आला आहे. या कामाची पाहणी भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकतीच केली. यामध्ये डॉ. निलेश गडे, व्यंकटेश बारी, मुकेश कोळी, भूषण फेगडे, राहुल बारी, अतुल चौधरी, बबलू घारू, कोमल इंगळे यांचा सहभाग होता.
रथोत्सवाच्या अनुषंगाने १२ टन वजनाच्या श्री बालाजी रथाची सजावट, रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून, महर्षी व्यास मंदिर येथून सायंकाळी रथ मिरवणूक सुरू होईल. रथ हडकाई-खडकाई नदीपात्रातून नेताना भक्तगण मोठ्या उत्साहाने रथ ओढतात. कुशलतेने रथाच्या चाकांना मोगरी लावून त्याला दिशा देणे हे खास वैशिष्ट्य असते. या दिवशी खंडोबा महाराजांची यात्रा देखील होणार असून, महाराणा प्रताप नगर येथील मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. सायंकाळी खडकाई नदी पात्रात यात्रा पार पडणार असून, चोपडा रस्त्यावरून १२ गाड्या ओढल्या जाणार आहेत. यात्रेच्या अनुषंगाने नदीपात्रातही स्वच्छता करण्यात आली आहे.
या रथोत्सवाला गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. सन १९१४ मध्ये कै. पांडूरंग धोंडू देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री बालाजी रथोत्सव सुरू केला होता. त्या काळात रामजी मिस्त्री यांनी रथाची निर्मिती विनामूल्य केली होती. पूजा व्यवस्थेत वासुदेवबाबा बियाणी, राजाभाऊ नागराज, भैय्याजी अग्नीहोत्री यांचा महत्त्वाचा वाटा होता. १९७३ ते २००६ दरम्यान रमेशशास्त्री बयाणी, नारायणराव बयाणी, बलवंत जोशी यांनी हे कार्य सांभाळले. २००६ नंतर महेश बयाणी, राजु बयाणी आणि सुनील जोशी यांच्याकडे पुजारी पदाची जबाबदारी आहे.