भुसावळ प्रतिनिधी | शहरातील खडका रोड भागातील महालक्ष्मी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रीमध्ये या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात येते. यासाठी मंदिर आकर्षक रोषणाई सजविण्यात येते. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीस सुरुवात झाली आहे.
भक्ताच्या नवसाला पावणारी आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी माता म्हणून प्रसिद्ध आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी संस्थांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. पुरातन मंदिराची पडझड होत असल्याने काही भाविकांनी एकत्र येऊन जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार २००१ मध्ये हे मंदिर भव्य स्वरूपात पुन्हा उभारण्यात आले आहे. जीर्णोद्धारासोबतच वृक्षारोपण केल्याने मंदिराचा परिसर हिरवाईने नटला आहे. नवरात्रीमध्ये महापूजा, रुद्राक्ष, शांतीपाठ, नंदादीप, कुंकुमार्चन, ललित पंचमी, अलंकार पूजा, नवचंडीचे पाठ आणि अष्टमीला महायज्ञ असे धार्मिक विधी केले जातात. महालक्ष्मी मंदिराच्या आवारातच रामभक्त हनुमान व परशुराम मंदिर बांधण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना हनुमान व परशुराम यांचे एकत्रित दर्शन घेणे सोयीचे होते. विशेष म्हणजे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी वाचण्यास विविध प्रकारचे ग्रंथदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रमुख्याने नवरात्रोत्सवात मंदिराची सौंदर्य खुलते आकर्षक रोषणाई , धार्मिक कार्यक्रमामुळे परिसर गजबजतो. मंदिराचे ट्रस्टी व परिसरातील नागरिक संपूर्ण उत्सव कालावधीत भाविकांची कोणती गैरसोय होणार नाही यासाठी लक्ष ठेऊन असतात.