जळगाव (प्रतिनिधी) वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी होत आहे. मागील वर्षीच्या घटना लक्षात घेत यंदा अनेक केंद्रावर व्यवस्था चोख ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, मागील वर्षापासून बीड, बुलडाणा, लातूर, जळगाव, सोलापूर, मुंबई उपनगर या शहरात नीट परीक्षा घेतली जात असल्यामुळे नीटची केंद्र वाढवली आहेत. परंतु तरी देखील जळगावातील परीक्षा केंद्रावर काहीसा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र होते.
देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेली नीट रविवारी देशभरात विविध शहरांमधून होत आहे. जळगाव केंद्रावरूनही परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढते आहे. मागील वर्षी पेहरावावरून काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. यंदा पूर्वीच विद्यार्थ्यांना, परीक्षा केंद्रप्रमुखांना सुचना देण्यात आल्या आहेत. परीक्षार्थींने परीक्षा केंद्रावर येताना काय काळजी घ्यायची, पेहराव कसा असावा याबाबत सूचना वेबसाइटवरही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार परीक्षेसाठी परीक्षार्थीकडून केंद्रावर दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे घेण्यात आली. हॉलतिकीट, परीक्षार्थींना साधे लाइट हाफ स्लीव्ज कपडे परिधान करण्याच्या सूचनांची देखील अमलबजावणी झाली. यासह कोणत्याही डिजीटल गॅझेटला परवानगी देण्यात आली नव्हती. परीक्षा दुपारी दोन ते पाच यादरम्यान होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात दुपारी बारा ते दीड या कालावधीत प्रवेश दिला गेला.