धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील पाळधी ते वराड रस्त्यादरम्यान भरधाव कारने दुचाकीवरील दांपत्याला जबर धडक दिली. या धडकेत गरोदर महिलेचा डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाला असून तपासणीअंती पोटातील बाळाचा देखील मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी पाळधी दुरुक्षेत्र पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
योगेश गुलाब कोळी (वय २८, रा. जुना असोदा रोड, जळगाव) हे आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, तीन वर्षाची मुलगी यांच्यासह जुना आसोदा रोड परिसरात राहतात. भंडारी कन्स्ट्रक्शन येथे चालक म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी ८ महिन्याची गरोदर असून पुढील महिन्यात त्यांच्या घरात आनंदाची वार्ता येणार होती. रविवारी दि. १२ मे रोजी ते एरंडोल येथे नातेवाईकाला पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुपारून परत जळगावला येत असताना दुपारी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान वराड ते पाळधी दरम्यान भरधाव कार क्रमांक (एम एच १९ सीएफ ९७९७ त्यांना मागून जवळ धडक दिली.
या धडकेत दांपत्य रस्त्यावर फेकले गेले. यात योगेश कोळी यांची पत्नी दिपाली (वय २८) यांना डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तातडीने आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी सदर महिला आणि स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाच्या मदतीने बाळाची तपासणी केली असता दोन्ही मयत झाल्याचे तपासांती दिसून आले.
तर योगेश कोळी आणि त्यांची तीन वर्षाची मुलगी काव्या कोळी हे जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.