मुंबई प्रतिनिधी | मुंबै जिल्हा बँकेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे.
मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. मुंबै बँक निवडणुकीत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेल सर्व २१ जागांवर विजयी झाले आहेत. यातील १७ जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. तर चार जागांसाठी निवडणूक झाली होती. या चार जागांची मतमोजणी आज पार पडली.
आज झालेल्या मतमोजणीत प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले. मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघातून विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा पराभव केला. महिला सहकारी संस्था मतदार संघ जयश्री पांचाळ तर भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांनी विजय संपादन केला आहे.
दरम्यान, प्रवीण दरेकर यांच्या पॅनलमध्ये भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधित असलेल्या उमेदवारांचा समावेश होता. तर, शिवसेना बंडखोरांनी चार ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली. मुंबै बँकेत अभिजीत घोसाळकर, सुनिल राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर या विजयानंतर प्रवीण दरेकर म्हणाले की, मुंबै जिल्हा बँकेच्या मतदारांनी आमच्या कारभारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. अनेकांनी मुंबै जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत टीकाटिप्पणी केली होती. मात्र, मुंबईतील सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.