नागपूर प्रतिनिधी । माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांचा वाढसिवसाच्या पूर्वसंध्येला नागपुर येथे नागरी सत्कार करण्यात आला. याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती होती.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय नागपूर केंद्राच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन राऊत, खासदार प्रफुल्ल पटेल, खा. कृपाल तुमाने, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आमदार अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे, दीपक केसरकर व संयोजक गिरीश गांधी उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कन्या राष्ट्रपती होणार असतील तर त्यांच्या आड शिवसेना येणार नाही आणि कुणालाही येऊ देणार नाही अशी खंबीर भूमिका तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. अशी भूमिका जाहीर केल्यावर तेव्हाही शिवसेनेवर दबाव होता. मात्र कितीही मतभिन्नता असली तरी राज्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. या भावनेतून प्रतिभाताईंचे समर्थन केल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिभाताईंशी माझ्या आजोबांपासूनचे ऋणानुबंध आहेत. मध्यंतरी भेटी झाल्या नाहीत तरी ते नाते घट्टपणे जपले गेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रतिभाताईंना पाठिंबा देण्यासाठी आम्ही बाळासाहेबांच्या भेटीला गेल्यावर त्यांनी कोणतीही चर्चा करण्याचे कारण नाही, असे सांगून महाराष्ट्राच्या कन्या असलेल्या प्रतिभाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला. बाळासाहेबांनी पाठिंबा दिलेल्या दोन व्यक्ती प्रतिभाताई आणि प्रणव मुखर्जी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशस्वी झाल्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याप्रसंगी आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना प्रतिभाताईंचा मृदू स्वभाव मला कधीच जाणवला नाही. त्यांनी अतिशय आक्रमकपणे विरोधी पक्षनेत्यांची भूमिका पार पाडली अशी आठवण श्री. पवार यांनी सांगितली. देशातील सर्व राज्याच्या कृषिमंत्र्यांची बैठक घेऊन शेतीसमोरील अडचणी आणि उपायांची टिपणे तयार करून प्रधानमंत्री आणि कृषिमंत्र्यांना पाठवणार्या त्या देशातील पहिल्याच राष्ट्रपती होत्या. रशियाच्या अतिशय वेगवान अशा सुखोई विमानात सैन्याचा पोशाख घालून प्रवास करणार्याही प्रतिभाताई पहिल्याच महिला राष्ट्रपती ठरल्या असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना प्रतिभाताई म्हणाल्या, लेकीबाळीचे कौतुक आणि सत्कार करण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे, आणि ही संस्कृती बाळासाहेबांनी दाखविली. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून व्यस्त असतानाही या कार्यक्रमाला वेळ काढून आलेत, हे बाळासाहेबांचे संस्कार असल्याचे त्या म्हणाल्या. महात्मा गांधींच्या अहिंसात्मक लढा, पंडीत जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान व त्याग केला. या देशाच्या पायाचे हे आधारस्तंभ आहेत. या ना आधारस्तंभांना विसरून कसे चालेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवाद, सार्वभौमत्व आणि संविधान दिलेल्यांना विसरून चालणार नाही. राष्ट्रभक्ती आणि विद्वत्ता असणार्या आंबेडकरांशिवाय संविधान लिहिण्याचे काम कोणी करू शकणार नाही, असा विश्वास महात्मा गांधींना होता. त्यांचे मतभेद असले तरी मनभेद नव्हते. राष्ट्रपती असताना त्या पदाचा मान आणि गौरव वाढविण्याचे काम करता आले, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अनिल देशमुख यांनी केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खासदार कृपाल तुमाने यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी तर आभार गिरीश गांधी यांनी मानले.