मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या पत्रकार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा असताना, पोलिसांनी त्याला तेलंगणातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलीस मागील काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करत होते. संशयित पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आली होती. पोलिसांनी कोरटकर चंद्रपूरमध्ये असल्याचा संशय व्यक्त केला होता, मात्र त्याने दुबईत आश्रय घेतल्याच्या चर्चा होत्या. अखेर, तेलंगणातून त्याच्या अटकेने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांकडून कोणतीही सवलत दिली जात नसल्याचे स्पष्ट केले. “प्रशांत कोरटकरवर कायदेशीर कारवाई होईल. कोणालाही पोलिस संरक्षण नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
प्रशांत कोरटकरला काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा संशय वर्तवला जात आहे. कोरटकरने नागपूर पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याचा आरोप आहे. तसेच, त्याने देश सोडण्यापूर्वी मोबाईल डेटा डिलीट केल्याचे वकील असीम सरोदे यांनी सांगितले होते. यामुळे, या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही तपासण्याची गरज असल्याचे मत काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्याला अटक होणार हे स्पष्ट झाले होते. अखेर, पोलिसांनी तेलंगणात त्याला अटक करून महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.प्रशांत कोरटकरच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे अनेक संघटनांनी जाहीर केले होते. त्यामुळे, कोरटकरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समाजातून मोठ्या प्रमाणात होत आहे.