जळगाव प्रतिनिधी । दोन जणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी न्यायालयात १३ साक्षीदार तपासण्यात आले होते.
याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव येथील रवींद्र सखाराम जाधव व महादेव मंदिराचे पुजारी शामकांत वसंत जोशी हे दि. ४ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी घराकडे जात असतांना आरोपी भाऊसाहेब शामराव पाटील यांनी काही कारण नसतांना रवींद्र जाधव यांच्याशी वाद घालत रवींद्र जाधव यांच्या कानाजवळ कोयद्याने वार केला. रवींद्र जाधव यांच्यावर वार झाल्याचे समजताच शांताराम जोशी हे त्यांना सोडविण्यासाठी गेले असता भाऊसाहेब पाटील याने शामकांत जोशी यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांना जखमी केले होते. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात येवून तपासाअंती न्यायालयात या प्रकरणाचे कामकाज सुरु होत या प्रकरणात फिर्यादी रवींद्र जाधव, शामकांत जोशी यांच्यासह एकूण १३ साक्षीदार तपासण्यात येवून दि. १९ रोजी न्यायालयाने या प्रकरणात भाऊसाहेब पाटील याला दोषी ठरवित भादवि कलम ३०७ अंतर्गत सात वर्षाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड व कलम ३२६ मध्ये ६ वर्षाची शिक्षा व ५ हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. वैशाली महाजन यांनी काम पाहिले.