जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी दूध संघाचे संचालक प्रमोद पांडुरंग पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून यासोबत पक्षाने दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी कार्याध्यक्ष तसेच जळगाव साठी महानगराध्यक्ष पदाची घोषणा देखील केलेली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी नेमके कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पदासाठी अनेक नावे समोर आली असली तरी अंतर्गत गटबाजीमुळे अद्यापही नावे जाहीर करण्यात आली नव्हती. यातच अनेक जणांनी या पदावर आपला दावा ठोकला असल्यामुळे या सस्पेन्स मध्ये अजूनच मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती.
खरं तर अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये प्रमोद पाटील हे आघाडीवर असल्याचे गेल्या दोन दिवसांपासूनच स्पष्ट झालेले होते. त्यांचे नाव जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर होईल असे वाटत होते. या अनुषंगाने आज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या वतीने अधिकृतरित्या जिल्हाध्यक्ष पदाची घोषणा केली असून यात जिल्हाध्यक्ष म्हणून चाळीसगाव येथील प्रमोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे
दरम्यान या सोबत शरद पवार गटाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा देखील केलेली आहे. यात जळगाव महानगर अध्यक्षपदी पक्षाचे अल्पसंख्यांक समुदायातील नेते एजाज गफ्फार मलिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जळगाव लोकसभा कार्याध्यक्षपदी शालिग्राम मालकर यांची तर रावेर लोकसभा कार्याध्यक्षपदी वरणगाव येथील राजेंद्र विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती देखील आज जाहीर करण्यात आलेली आहे.
दरम्यान, यासोबत, संग्राम सूर्यवंशी आणि सचिन पाटील या दोघांना जळगाव महानगर कार्याध्यक्ष हे पद देण्यात आलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज रात्री याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपुष्टात आलेला आहे.
आजच्या या नियुक्त्यांच्या माध्यमातून पक्षाने मराठा ओबीसी आणि अल्पसंख्यांक असे गणित चांगल्या पद्धतीने साधल्याचे दिसून आले आहे. प्रमोद पाटील हे सहकारातील मोठे व्यक्तिमत्व असून ते मराठा समाजाचे आहेत. तर जळगाव लोकसभेचे कार्याध्यक्ष हे ओबीसी समुदायातील आणि महानगर अध्यक्ष एजाज मलिक हे अल्पसंख्यांक समाजातील आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील कार्याध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी हे देखील ओबीसी समुदायातील आहेत. या माध्यमातून पक्षाने अतिशय अचूक असे ‘सोशल इंजीनियरिंग’ केल्याचे दिसून येत आहे.