Home Cities भुसावळ अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळकर प्राजक्ता पाटलांच्या गझलेने रसिकांची जिंकली...

अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळकर प्राजक्ता पाटलांच्या गझलेने रसिकांची जिंकली मने


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन २०२६ अंतर्गत गझलकट्ट्यात भुसावळ येथील प्राजक्ता राहुल पाटील यांच्या प्रभावी गझल सादरीकरणाने साहित्यप्रेमी रसिकांवर गारूड केले. १७ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे पार पडलेल्या या संमेलनात त्यांच्या गझलेची निवड होणे ही त्यांच्या साहित्यिक गुणवत्तेची महत्त्वपूर्ण पोचपावती ठरली.

न्हावी येथील फेगडे गुरूजी यांची नात व भुसावळमधील हनुमान नगर येथील गोपाल प्रेमचंद पाटील यांच्या सून असलेल्या प्राजक्ता पाटील या नव्या पिढीतील संवेदनशील, अभ्यासू व प्रभावी गझलकार म्हणून आपली ओळख निर्माण करीत आहेत. त्यांच्या लेखनात स्त्रीमनाचे सूक्ष्म भाव, निसर्गाशी असलेले नाते आणि पारंपरिक गझलशास्त्र यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळतो.

सादरीकरणादरम्यान त्यांनी सादर केलेले शेर रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले.
“बाईवरती ज्यांची असते नजर नेहमी त्यांची
हयात सारी उलटून जाते प्रेम समजण्यासाठी”

या ओळींमधून समाजातील वास्तवावर नेमकी टिप्पणी करत त्यांनी स्त्रीसंवेदनांचे सखोल दर्शन घडवले.

तसेच,
“सांग निसर्गापासुन कुठवर जपशिल वेली?
कळी उमलण्याचा उत्कट क्षण येणारच ना”

या शेरातून स्त्रीची सहनशीलता, आत्मविश्वास आणि स्व-अभिव्यक्तीचा उत्कट क्षण प्रभावीपणे उलगडला.

याशिवाय,
“केवळ प्राजू नाही मी तर तुझी सावली
कृष्णासोबत.. राधा गौळण येणारच ना”

या शेरातून प्रेम, समर्पण आणि स्त्रीअस्मितेचा भाव त्यांनी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मांडला.

त्यांच्या आवाजातील आत्मविश्वास, शब्दोच्चारातील सहजता आणि भावनांची प्रामाणिक मांडणी यामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला, तर मान्यवर साहित्यिकांनी विशेष शब्दांत त्यांचे अभिनंदन केले.

प्राजक्ता पाटील यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण व निमशहरी भागातील होतकरू मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. साहित्य क्षेत्रात स्त्रीप्रतिभेला मिळणाऱ्या संधींचे हे यशस्वी व आशादायक चित्र असल्याची भावना उपस्थित रसिकांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound