नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. नितीन गडकरी यांनी देशातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी केलेल्या चांगल्या कामाचे सोनिया गांधी यांनी बाक वाजवून कौतुक केले. काँग्रेसच्या इतर खासदारांनीही त्यांना साथ दिली. शून्य तासामध्ये सभागृहात नितीन गडकरींच्या मंत्रालयाशी संबंधित दोन प्रश्न घेण्यात आले. यावेळी देशभरात रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी गडकरींच्या मंत्रालयाकडून सुरु असलेल्या तसेच रखडलेल्या कामाची सविस्तर माहिती देण्यात आली.
आज दुपारी शून्य प्रहरामध्ये रस्त्यांच्या प्रकल्पांसंदर्भात एक प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला होता. यावेळी गडकरींनी सर्व पूर्ण झालेल्या प्रकल्पांची आणि रखडलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.’ सर्व पक्षांचेच खासदार त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील बदल पाहून माझ्या मंत्रालयाने केलेल्या कामांचं निश्चित कौतुक करतील’ असं विधान करत गडकरींनी त्यांच्या भाषणाची सांगता केली. भाजपच्या सर्व खासदारांनी बाक वाजवून गडकरींचे कौतुक केले. त्यानंतर मध्य प्रदेशातील भाजप खासदार गणेश सिंह यांनी संपूर्ण सभागृहानेच गडकरींचं कौतुक करावं अशी विनंती त्यांनी केली. हे वाक्य ऐकताच सभागृहात शांतता पसरली. तेव्हा सोनिया गांधींनी पुढाकार घेत बाक वाजवला. संपुआच्या अध्यक्षाच कौतुक करत आहेत हे पाहून मल्लिकार्जुन खर्गेंसह सर्वच विरोधी पक्षातील खासदारांनी बाक वाजवण्यास सुरुवात केली. पाहता पाहता संपूर्ण सभागृहाने बाक वाजवून गडकरींची प्रशंसा केली. दरम्यान, सोनिया गांधी यांनी गतवर्षी नितीन गडकरी यांना पत्र लिहून रायबरेलीतील रस्त्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर नितीन गडकरी यांनी दिलेल्या सकारात्मक उत्तरानंतर सोनिया गांधी यांनी त्यांचे आभार मानले होते.