जळगाव प्रतिनिधी | अखील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भडगाव येथील ज्येष्ठ पदाधिकारी प्रदीप पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी जळगाव महानगराध्यक्षपदी शाम तायडे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरही खांदेपालट करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले होते. या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे राष्ट्रीय जनरल सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी नऊ जिल्हयांचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर केली. यात जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रदीप पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
प्रदीप पवार हे भडगाव येथील देशमुखवाडीचे रहिवासी आहेत. विद्यापीठ प्रतिनिधी, एनएसयुआयचे महाराष्ट्र सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश सेवादल उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी त्यांना मिळाली आहे. सन १९९२मध्ये भडगाव पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले. जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती म्हणून काम पाहिलेले आहे. दरम्यान, पक्षाच्या कार्यकारिणीत जिल्ह्यातील विनोद कोळपकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे.