चोपडा, प्रतिनिधी | मी गूळ प्रकल्प, चिंचपाणी धरण, सूतगिरणी असे अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत आणि यावेळेस प्रभाकरआप्पा निवडून आल्यानंतर सर्वप्रथम चहार्डी भागात औद्योगिक वसाहत उभी करणार म्हणजे तालुक्यातील माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध होईल, मी सर्व पक्षिय नेत्यांच्या समोर शब्द देतो की, तालुक्यात विकासगंगा आणणार त्यामुळे आपण प्रभाकर गोटू सोनवणे यांना भरघोस मताधिक्याने आपण त्यांना निवडून दयावे. असे स्पष्ट आवाहन तालुक्याचे माजी आमदार कैलास पाटील यांनी आज (दि.१५) अकुलखेडा येथे आयोजित अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांच्या बूथ मेळाव्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
ते पुढे म्हणाले की, मागच्या पंचवार्षिक निवडणूकीत चोपडा विधानसभा क्षेत्रातील मतदारांची इच्छा नसतांनाही विद्यमान आमदारांचा जिल्ह्याचे नेते सुरेशदादा जैन, गुलाबराव पाटील यांच्या आदेशाखातर मला प्रचार करावा लागला होता आणि माझ्यावर भरोसा ठेऊन मतदारांनी त्यांना निवडूनही दिले मागील निवडणूकीत काळात जे-जे आश्वासन जनतेला आम्ही दिले होते, ते आश्वासन आमदारांनी एकही पूर्ण केले नाही म्हणून मी चोपडा विधानसभा क्षेत्रातील मतदारांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.
यावेळी माजी आमदार पाटील हे बोलताना भावुक होवून म्हणाले की, मी आमदारांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्याच्या माध्यमातून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. परंतु मी जाहीर सांगतो की, सूतगिरणीत एक रुपयांचाही भ्रष्टाचार सापडला तर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. संपूर्ण तालुक्यालात फिरत आहे तर सर्व जनता सांगते की, बापू तुमची चूक तुम्हाला कळाली आणि ह्या वर्षी तुम्ही ती चूक सुधारली आहे. प्रभाकर आप्पाच्या रूपात सर्व सामान्य मतदारांचा प्रतिनिधी मिळाला आहे, तरी जनतेचा कौल बघता आप्पांना वाढदिवसाच्या पूर्व संध्याला मिळालेल्या शुभेच्छा पाहून असे वाटते की, आजच निवडून आले आहेत. यावेळी भाजपाचे, माजी आमदार पाटील यांच्या गटातील शिवसेनेचे, रासपचे, रिपाईचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होत. मेळाव्याचे सूत्रसंचालन धनंजय पाटील यांनी केले.