जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकरआप्पा सोनवणे यांनी चोपडा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने आजी-माजी आमदारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकरआप्पा सोनवणे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून चोपडा विधानसभा मतदारसंघात संपर्क मोहीम सुरू केली होती. त्यांनी गावागावात जाऊन मतदारांशी संपर्क साधून परिवर्तनाची सादर घातली होती. महायुती झाल्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटली. याआधीच आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना घरकूल प्रकरणात शिक्षा झाल्याने ते अडचणीत आले. परिणामी शिवसेनेने त्यांच्या सौभाग्यवतींना तिकिट दिले. तर माजी आमदार जगदीश वळवी यांनी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी मिळवली. या पार्श्वभूमिवर, प्रभाकरआप्पांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने आजी व माजी आमदारांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रभाकर सोनवणे यांचा चोपडा तालुक्यात उत्तम जनसंपर्क असून भारतीय जनता पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सामाजिक पातळीवरील समीकरणातही ते मागे पडणारे नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे समाजकल्याण सभापती म्हणून त्यांनी केलेली कामगिरी ही उजवी ठरणारी आहे. चोपडा मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याची ग्वाही देत त्यांनी परिवर्तनाचा नारा बुलंद केल्याने याचा सरळ फटका आजी-माजी आमदारांना बसण्याची शक्यता दिसून येत आहे.