Home आंतरराष्ट्रीय बांगलादेशात भीषण भूकंपाचा तडाखा : 6 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी 

बांगलादेशात भीषण भूकंपाचा तडाखा : 6 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी 


ढाका-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बांगलादेशमध्ये आज सकाळी आलेल्या 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने मोठे नुकसान घडवून आणले. सकाळी 10 वाजून 8 मिनिटांनी आलेल्या या भूकंपात सहा जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ढाक्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावरील नरसिंगडीच्या माधाबादी भागात या भूकंपाचे केंद्र असल्याचे भू-विज्ञान विभागाने स्पष्ट केले आहे. अचानक आलेल्या या धक्क्याने लोक घाबरून बाहेर पळाले आणि अनेक ठिकाणी इमारती हलल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

भूकंपाचा जोर इतका मोठा होता की माधाबादी परिसरातील दहा मजली इमारत एका बाजूला झुकली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवा दलांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसर सील केला आहे. या इमारतीमध्ये अनेक कुटुंबे राहत असल्याने सुरक्षेसाठी सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. भूकंपाचा परिणाम क्रीडा विश्वावरही झाला असून बांगलादेश-आयर्लंड यांच्यात सुरू असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना तत्काळ थांबवण्यात आला. मैदानातील खेळाडू आणि प्रेक्षकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

गाझीपूरमधील श्रीपूर भागात सर्वात भीषण घटना घडली. ‘डेनिमेक’ या बहुमजली कापड कारखान्यातून बाहेर पडण्यासाठी कामगारांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 150 हून अधिक जण जखमी झाले. भूकंपानंतर कारखान्याचे मुख्य गेट उघडण्यात प्रशासनाने उशीर केल्याने घबराट वाढली आणि मोठा गोंधळ निर्माण झाला, अशी माहिती कामगारांनी दिली. जखमींवर श्रीपूर उपजिल्हा आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

नारायणगंजच्या रूपगंज उपजिल्ह्यातही दुर्दैवी घटना घडली. भूकंपादरम्यान भिंत कोसळून 10 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला. तिची आई आणि एक शेजारी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीच्या आईने सांगितले की, भूकंपाचा धक्का जाणवताच ती मुलीला घेऊन घरातून बाहेर पडत होती, तेवढ्यात रस्त्यालगतची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली.

या भूकंपाचे धक्के बांगलादेशाबरोबरच भारतातील पश्चिम बंगालमध्येही जाणवले. कोलकाता, कूचबिहार, दक्षिण दिनाजपूर, मालदा आणि नादिया येथे सुमारे 20 सेकंदांपर्यंत जमिनीला कंप जाणवला. रिश्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता 5.2 इतकी नोंदवली गेली. सुदैवाने या भागांमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

बांगलादेश भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिक पुन्हा एकदा सावध झाले आहेत. 1762 मध्ये रिश्टर स्केलवर 8.5 तीव्रतेचा ‘ग्रेट अराकान भूकंप’ झाल्यानंतर आजवरचा हा सर्वात जाणवणारा धक्का मानला जात आहे. आपत्कालीन सेवा दलांकडून बचावकार्य सुरू असून आणखी काही नुकसानाचे अहवाल येण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound