
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालात अखेरच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला भाजप आणि शिवसेना शिंदे गट आघाडीवर असल्याचे चित्र असताना आता आकडे बदलले असून सत्तासमीकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. या उलथापालथीमुळे भाजपला मोठा धक्का बसला असून मुंबईचा पुढील महापौर नेमका कोणाचा, याबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.

आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार भाजप 84 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना शिंदे गट 26 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महायुतीचे एकूण 110 उमेदवार आघाडीवर असले तरी बहुमताचा आकडा अजूनही गाठलेला नाही. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने जोरदार पुनरागमन करत 64 जागांवर आघाडी घेतली असून मनसेचे 8 उमेदवार आघाडीवर आहेत. ठाकरे गट आणि मनसे मिळून एकूण 72 जागांवर आघाडीवर असल्याने लढत रंगतदार बनली आहे.
मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा असून सत्ता स्थापनेसाठी 114 जागांची आवश्यकता आहे. सध्याच्या स्थितीत भाजप-शिंदे गट बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असले तरी निर्णायक आकडा अद्याप त्यांच्या हातात आलेला नाही. त्यामुळे प्रत्येक फेरीचे निकाल आणि उर्वरित जागांवरील कल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सत्तासंघर्षात काँग्रेसने अनपेक्षित मुसंडी मारली आहे. काँग्रेसचे 23 उमेदवार आघाडीवर असून या आकडेवारीमुळे काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणत्याही आघाडीला बहुमत न मिळाल्यास काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आकडे फिरत असताना भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची धाकधूक वाढली असून, दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. महापौरपदावर कोणाचा दावा राहणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी अंतिम निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. मुंबईच्या सत्तेचा किल्ला कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



