पाचोरा, प्रतिनिधी । सर्व सामान्य नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आणि कोरोना आजाराच्या सावटाखाली वाटचाल करीत आहेत. कामधंदा, ठप्प झाल्याने रोजी रोटीच्या व कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी, बेरोजगारीला कर्जबाजारीला तोंड देता – देता नागरिक जेरीस आले आहेत. अशा वेळी सद्यस्थितीत विज वितरण विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे वीज पुरवठा अवेळी खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहे.
राज्यातील आघाडी सरकारने मुबलक विज देण्याचे व वीज कपात होणार नाही असे आश्वासन सत्तेवर बसण्यापूर्वी दिले होते. शिवसेना- राष्ट्रवादी – काँग्रेसच्या आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या वचनपूर्तीकडे पाठ फिरवून थकीत वीजबिल धारक शेतकऱ्यांची वीज कापणी सुरू केल्याने राज्य सरकारच्या मनमानी धोरणाविरोधात विरोधीपक्ष रस्त्यांवर उतरला होता. याची नाराजी शेतकरी वर्गात आहे. ही समस्या असतांना वीज वितरण मंडळाने विजेचे दर वाढवून सामान्य जनतेला दरवाढीचा शॉक दिल्याने दुहेरी नाराजी ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. नवीन ऑनलाइन मीटरमुळे अवाजवी बिले येत आहे. वीज वितरणच्या मनमानी निर्णयांना सामोरे जात असतांना पाचोरा तालुक्यात विजेच्या लपंडाव समस्यांनी नागरिक संतप्त आहेत. काही दिवसांवर पावसाळा तोंडावर आहे. पावसाळ्यात विजेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. वीज वितरण विभागाकडून पावसाळ्यात पूर्व तयारीचे काहीही नियोजन दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात व शहरी भागात वीज अवेळी अचानक गुल होते. कधी अनेक तास वीज पुरवठा खंडित होत आहे. ग्रामीण भागात हा प्रकार नेहमीचा असल्याने शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी देण्यासाठी डोळ्यात तेल घालुन विजेची वाट पहावी लागते. सद्या विज पुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज मंडळाने लोडशेडिंग सुरू केले आहे की काय? याबाबत ही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
आमदार किशोर पाटील यांनी सद्यस्थितीला पाचोरा विज वितरण विभागात विचारणा करून नागरिकांना वारंवार खंडीत होणाऱ्या विजेच्या समस्यांपासून दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.