पारोळा-विकास चौधरी | राज्य सरकारने जळगाव जिल्हा दूध संघातील विद्यमान मंडळ बरखास्त करून आज प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. प्रशासक मंडळात मातब्बर नेते व त्यांच्या समर्थकांचा समावेश आहे. यातील पारोळ्यातील पाटील कुटुंबाने साधलेला अफलातून योगायोग हा राजकीय आणि सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाची विद्यमान कार्यकारीणी बरखास्त करून राज्य सरकारने यावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. यातील मुख्य प्रशासक हे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण असून त्यांच्यासोबत दहा प्रशासकांच्या मंडळाचा समावेश आहे. प्रशासक मंडळातील सर्व सदस्य हे भाजप अथवा शिंदे गटाशी संबंधीत आहेत. याच पारोळा येथील अमोल चिमणराव पाटील यांनाही संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यातील विलक्षण योगायोग असा की, त्यांचेच वडिल आमदार चिमणआबा पाटील हे आज बरखास्त केलेल्या कार्यकारिणीत संचालक होते. अर्थात, एकीकडे वडीलांचे पद बरखास्त होत असतांना दुसरीकडे मुलाला प्रशासक म्हणून पद मिळत असल्याचा दुर्मीळ योगायोग यातून साधला गेला आहे.
अमोल पाटील यांनी आधीच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, जिल्हा बँक संचालक म्हणून काम पाहिले असून आता त्यांना दूध संघावर प्रशासक म्हणून महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. तर त्यांचे पिताश्री चिमणआबा पाटील हे १९७८ पासून (मध्यंतरी एनडीडीबीच्या काळात ताबा असण्याचा कालखंड वगळता !) आजवर दूध संघाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. आज बरखास्त करण्यात आलेल्या संचालक मंडळात ते सर्वात ज्येष्ठ संचालक होते. तर, त्यांच्या संचालकपदाच्या बरखास्तीच्या नंतर त्यांचे पुत्र अमोल पाटील यांना प्रशासक पद मिळावे हा एक मोठा योगायोग आहे. जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील हा अफलातून योगायोग चर्चेचा विषय बनला आहे.
अमोल पाटील हे आमदार चिमणआबा पाटील यांचे राजकीय वारसदार असून पुढील विधानसभा निवडणुकीत ते स्वत: रिंगणात राहतील असे संकेत आधीच मिळाले आहेत. या पार्श्वभूमिवर, सहकार क्षेत्रात जेडीसीसीच्या पाठोपाठ दूध संघातही त्यांचे यशस्वी लॉंचींग करण्यात आल्याचे आता मानले जात आहे.