मुंबई प्रतिनिधी । कोविडच्या आपत्तीमुळे राज्य शासनाच्या सेवेत असणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, कोविडच्या आपत्तीमुळे गत वर्षी राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचारी आणि अधिकार्यांची बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. यानंतर याला ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परिणामी गेल्या वर्षी बदल्या झाल्या नाहीत.
यानंतर यंदा एप्रिल-मे महिन्यात साधारणपणे बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात येते. मात्र गेल्या वर्षापेक्षाही जास्त प्रमाणात कोविडचा प्रकोप सुरू असल्यामुळे यंदा देखील बदल्यांची प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय (जीआर) आज प्रसिध्द करण्यात आला आहे. अगदीच अपवादात्मक परिस्थिती वगळता बदल्या करण्यात येऊ नयेत असे स्पष्ट निर्देश यात देण्यात आलेले आहेत. यामुळे यंदा देखील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या बदल्या होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.