आ. लताताई सोनवणे यांची आमदारकी धोक्यात !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांची जात प्रमाणपत्राबाबतची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. तर, या प्रकरणी त्या सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चोपडा मदारसंघातून शिवसेनेतर्फे लताताई चंद्रकांत सोनवणे या अनुसूचित जमातीमधील टोकरे कोळी या जातीच्या प्रमाणपत्रावर लढून निवडून आल्या होत्या. निकाल लागल्यानंतर त्यांच्या जातीच्या दाव्यासंबंंधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांनी आक्षेप घेत नंदुरबारच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे तक्रार दाखल केली होती.

या समितीने चौकशी करून डिसेंबर २०२१ मध्ये जात प्रमाणपत्र तपासणी समितीने संबंधित दावा अवैध ठरवला होता. समितीच्या या निर्णयाविरुद्ध आमदार लता सोनवणे यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आले होते. नंदुरबार तपासणी समितीचा निर्णय रद्द करून अनुसूचित जमातीमधील टोकरे कोळी हे प्रमाणपत्र वैध ठरवण्यात यावे, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली होती.

दरम्यान, या प्रकरणी खंडपीठात सुनावणी झाली. यात जगदीश वळवी यांच्यावतीने ऍड. योगेश बोलकर यांच्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांनी बाजू मांडली. त्यांनी लताताई सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली. तर याचिकाकर्त्या सोनवणे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे यांनी काम पाहिले. न्यायमूर्तींनी आपल्या निकालातून जात पडताळणी समितीचा निकाल कायम ठेवला. यामुळे लताताई सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आलेली आहे. तथापि, त्यांना या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाद मागता येणार असून त्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. अर्थात, त्यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय हा सुप्रीम कोर्टात होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Protected Content