जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभेच्या निवडणुका होऊन सहा महिने होत नाहीत तोच राज्यामध्ये विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा सदस्यांकडून निवडण्यात येणा-या या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य असलेल्या पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. या पाच जागांसाठी हे मतदान होणार आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेतील आमदार विधानसभेवर निवडून गेले होते. विधानसभेवर निवड झाल्यानंतर या पाचही जणांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या आहे.
़
विधान परिषदेच्या या पाच जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीचा कार्यक्रम थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे. या निवडणुकीसाठी १० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही १७ मार्च असेल. १८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख २० मार्च असेल. २७ मार्च रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान होईल. तर मतदान पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.