मुंबई प्रतिनिधी । एकीकडे महाविकास आघाडी आकारास येत असतांना भाजपने अतिशय कौशल्याने एका रात्रीतून राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा अक्षरश: गेम केल्याचे दिसून येत आहे.
काल रात्रीपर्यंत राज्याचे पुढील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असतील हे स्पष्ट झाले होते. आज याबाबत अधिकृत घोषणा होऊन महाविकास आघाडीतर्फे सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात येईल असे मानले जात होते. मात्र रात्रीतून मोठ्या घडामोडी झाल्या. रात्री एक वाजेच्या सुमारास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवावी अशी विनंती करणारे पत्र पाठविले. यावर दीड वाजेला राष्ट्रपती राजवट उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री अडीच वाजता राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले. याचवेळी सकाळी लवकर शपथविधी घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार आज सकाळी शपथविधी उरकण्यात आला. अर्थात, हा एक प्रकारे राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’ असून यातून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा अक्षरश: गेम करण्यात आल्याचे दिसून येत आहे.