मुंबई (वृत्तसंस्था) ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा’ असे लिहिलेले पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर मनसेचे राजकीय सर्जिकल स्ट्राईक चर्चेत आले असून राज ठाकरे येत्या शनिवारी मुंबईत सभा घेणार आहेत.
भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा इशारा दिला आहे. येत्या शनिवारी, म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी पाच वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे राष्ट्रवादीसोबत महाघाडीत येण्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादीकडून मनसेला हिरवा कंदील मिळाल्याचे म्हटले जातं आहे. त्यामुळे शनिवारी राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.