नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्याआधी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. भाजपचे लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे, त्यामुळे भाजप देशातील प्रादेशिक पक्षांनाही आपल्या गटात सामील करून घेत आहे. यात आता भाजपने झारखंड राज्यात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. झारखंडमधील सत्तधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्रमुख नेत्या आमदार सीता सोरेन यांनी पक्षाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहेत. त्यामुळे झारखंडमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे.
सीता सोरेन या झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे मोठे भाऊ दुर्गा सोरेन यांच्या पत्नी आहे. दुर्गा सोरेन यांचा २००९ साली निधन झाले होते. त्यानंतर २००९ सालीच सीता सोरेन या विधानसभेत आमदार झाल्या. २०१९ साली विधानसभेच्या निवडणूकीत विजय होऊन हेमंत सोरेन हे काँग्रेस, आरजेडी या पक्षाच्या पाठिब्यांने झारखंडचे मुख्यमंत्री झाले. हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रीपद देण्यात न आल्यामुळे सीता सोरेन नाराज असल्याची चर्चा होती.
अलीकडे हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्रीपद मिळू नये, अशी भूमिका सीता सोरेन यांनी घेतली होती. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन या सध्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्या इंडिया आघाडीच्या सभेत सहभागी होत आहे त्यामुळेही सीता सोरेन अस्वस्थ होत्या.
हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई सोरेन मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळातही सीता सोरेन यांना मंत्रिमंडळात पद न मिळता हेमंत सोरेन यांचे धाकटे भाऊ दुमकाचे आमदार बसंत सोरेन यांना मंत्रीपद देण्यात आले. या सर्व राजकीय घडामोडी बघूनच सीता सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा सुरू आहेत.