


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कौटूंबिक वादातून शहर वाहतूक शाखेत पोलीस कर्मचारी असलेल्या भावाकडून संभाजी नगरात राहणाऱ्या बहिणीला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संघमित्रा सुपडू शिंगारे (वय-४२) रा. संभाजी नगर, गाडगेबाबा चौक, जळगाव ह्या माहिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचा सख्खा भाऊ महेंद्र सुपडू शिंगारे हा पोलीस नाईक म्हणून भुसावळ शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा बहिण भावामध्ये कौटुंबिक वाद आहे. दरम्यान, महेंद्र शिंगारे याने ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता बहिण संघमित्रा शिंगारे यांना फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने महिन्याभरानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून भावाविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून महेंद्र शिंगारे याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.


