जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज गुरूवार १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पोलीसांतर्फे गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर रूट मार्च काढण्यात आला.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने डोके वर काढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात सांस्कृतीक कार्यक्रम व सण साजरे करण्यास मनाई करण्यात आले होते. दरम्यान, यंदा कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
यंदा गणेशोत्सवात नागरीकांमध्ये उत्साह दिसून आला. घरोघरी आणि गल्लोगल्ली गणेश मंडळाची स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सव शांततेत साजरा होण्याच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर रूट मार्च काढण्यात आला.
यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्यासह विविध विभागातील पोलीस कर्मचारी व फौजफाटा उपस्थित होते.