अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील मंगळ ग्रह मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी कारवाई करत एका पॅजो रिक्षातून अवैधपणे दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांनी रविवारी १६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता अटक केली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील मंगळग्रह मंदिर प्रवेशद्वार जवळील रोडवरून एका प्याजो रिक्षा मधून अवैधपणे दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिल्या. दरम्यान रविवारी १६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता पथकातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, उज्वल मस्के, निलेश मोरे यांनी सापळा रचून छापा टाकला. यावेळी अमळनेर शहराकडून येणारी बॅजो रिक्षा क्रमांक (एमएच १९ बीजे ५०१९) याची चौकशी केली असता, या वाहनांमध्ये ५८ हजार रूपये किंमतीचा देशी विदेशी दारूचा साठा मिळून आला. अमळनेर पोलिसांनी हा दारूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी रिक्षा चालक धनराज अशोक चौधरी वय-४६, रा.अमळगाव ता. अमळनेर याला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात प्रवीण काशिनाथ चौधरी याचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.