Home Cities जळगाव पोलीस भरती पारदर्शक ; उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये –  डॉ. महेश्वर...

पोलीस भरती पारदर्शक ; उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये –  डॉ. महेश्वर रेड्डी 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया आज दि. ११ फेब्रुवारी २०२६ पासून पोलीस मुख्यालय, जळगाव येथे अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात सुरू झाली आहे. गुणवत्तेच्या आधारे निवड होणार असल्याचे स्पष्ट करत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषाला किंवा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.

भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी एकूण ५०० उमेदवारांना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ३४० उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. शारीरिक मोजमापात ४१ उमेदवार अपात्र ठरले, तर मैदानी चाचणीत १७९ उमेदवार बाद झाले. विहित निकषांनुसार सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर १२० उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

संपूर्ण भरती प्रक्रिया ही पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असून मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मैदानावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवत आहेत. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी उमेदवार व त्यांच्या पालकांना सावधगिरीचा इशारा देताना सांगितले की, काही समाजकंटक किंवा दलाल “पोलीस भरतीत निवड करून देतो” असे खोटे आश्वासन देत पैशांची मागणी करू शकतात. अशा कोणत्याही व्यक्तींच्या भुलथापांना बळी पडू नये. पोलीस भरती प्रक्रियेत कोणालाही पैसे देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जर कोणत्याही व्यक्तीने भरतीच्या नावाखाली पैशांची मागणी केली किंवा फसवणुकीचा प्रयत्न केला, तर उमेदवारांनी तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.

जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे ही भरती प्रक्रिया केवळ मेहनत आणि गुणवत्तेच्या आधारेच पार पडणार असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. उमेदवारांनी आत्मविश्वासाने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी परीक्षेला सामोरे जावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound