Home Cities जळगाव पोलीस भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणार ; गैरप्रकारांना थारा नाही !

पोलीस भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणार ; गैरप्रकारांना थारा नाही !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील तरुणाई ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती, त्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर सुरुवात होत आहे. जिल्हा पोलीस दलातील १७१ रिक्त जागांसाठी बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ पासून पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.

१२ हजार उमेदवारांचे भवितव्य मैदानात:
जिल्ह्यातील १७१ जागांसाठी एकूण १२ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. भरतीच्या पहिल्या दिवशी (११ फेब्रुवारी) ५०० उमेदवारांची चाचणी घेतली जाईल. दुसऱ्या दिवशी १ हजार उमेदवारांना पाचारण करण्यात येईल, तर तिसऱ्या दिवसापासून पुढील नऊ दिवस दररोज १ हजार ५०० उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.

अशी असेल प्रवेश प्रक्रिया:
पारदर्शकतेसाठी यंदा कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना मैदानात प्रवेश देण्यापूर्वी त्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण, आधार कार्ड आणि अधिकृत प्रवेश पत्र (Hall Ticket) यांची कसून तपासणी केली जाईल. त्यानंतरच उमेदवाराला शारीरिक चाचणीसाठी प्रवेश दिला जाईल. मैदानी चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरच लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले.

गैरप्रकारांना थारा नाही:
“ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असेल. कोणत्याही उमेदवाराने कुणाच्याही आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नये,” असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. तसेच, भरती प्रक्रियेत तैनात असलेल्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केल्यास, त्याच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या भरतीमुळे जिल्ह्याच्या पोलीस दलाला नवे बळ मिळणार असून, उमेदवारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.


Protected Content

Play sound