पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे एका गोडावुन मध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती चाळीसगावचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार करत घटनास्थळी छापा टाकत पथकाने तारखेडा येथील एका गोडावुन मधुन तब्बल २६ लाख ८६ हजार ३६८ रुपयांचा अवैधरित्या साठवुन ठेवलेला गुटखा जप्त करत एका आरोपीस पकडण्यास पोलिसांना यश आले असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, गुरूवारी २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चाळीसगावचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांना गुप्तचरा कडुन माहिती मिळाली की, तारखेडा ता. पाचोरा येथील एका गोडावुन मध्ये राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य गुटखा, पान मसाला व तत्सम पदार्थ यांचा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी साठा करुन ठेवला आहे. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी तात्काळ पोलिस काॅन्स्टेबल अजय अशोक पाटील, महेश अरविंद बागुल, पोलिस नाईक राजेंद्र अजबराव निकम असे पथक तयार करुन रात्री ८ वाजेच्या सुमारास तारखेडा गाठले. गावात पोहचल्यानंतर एक – एक गोडावुन तपासत करत असतांना एका गोडावुन समोर एक इसम बसलेला आढळून आला.
गोपनिय माहितीनुसार पोलीस पथकाची धकडक कारवाई
पथकाने इसमास विचारपूस केली असता त्याने अनिल काशिनाथ वाणी रा. तारखेडा ता. पाचोरा असे सांगितले. पथकाने गोडवुनची तपासणी केली असता घबाळ बाहेर आले. गोडावुन मध्ये मोठ्या प्रमाणात गुटखाजन्य माल मिळुन आला. अभयसिंह देशमुख यांनी अनिल वाणी यास विचारले की, सदरील माल कोणाचा आहे ? त्यावर अनिल वाणी यांनी सांगितले माल हा दिलीप एकनाथ वाणी व गोकुळ एकनाथ वाणी यांचा असुन मी फक्त याठिकाणी विक्री करतो. अभयसिंह देशमुख यांनी तात्काळ पाचोरा पोलिस स्टेशनला खबर देवुन घटनास्थळी दाखल होण्याच्या सुचना दिल्या. तद्नंतर तात्काळ पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, योगेश गणगे, सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील व पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे घटनास्थळी दाखल होवुन पो. उ. नि. जितेंद्र वल्टे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अवैधरित्या गुटख्याच्या साठ्यासह अनिल वाणी यास ताब्यात घेत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आणले.
तंबाखुजन्य गुटखा, पानमसाला पोलिसांनी केला हस्तगत
जप्त करण्यात आलेल्या मालात १८ लाख ६७ हजार ८ रुपये किंमतीची विमल पान मसालाचे ४८ पोते त्यात एका पोत्यात २०८ पाकीटे व पाकीटात २२ पाऊच प्रत्येक पाऊचची किंमत ८.५ रुपये, ९ हजार ९०० रुपये किंमतीची व्ही. १ टोबॅको नावाची तंबाखुच्या ९ गोण्या एका गोणीत ४५० पाकिटे व एका पाकिटात ११ पाऊच एका पाऊचची किंमत २ रुपये, ४ लाख ९९ हजार २०० रुपये किंमतीची राज निवास सुगंधीत पान मसालाचे १३ पोते प्रत्येक पोत्यात २०० पाकिटे व एका पाकिटात ४८ पाऊच एका पाऊचची किंमत ४ रुपये, २ लाख ५४ हजार १०० रुपये किंमतीची व्ही. १ टोबॅको नावाच्या तंबाखुच्या ७ गोण्या एका गोणीत १ हजार ६५० पाकीटे व एका पाकिटात २२ पाऊच एका पाऊचची किंमत १.५ रुपये, ५६ हजार १६० रुपये किंमतीचे सागर पान मसालाचे २ पोते प्रत्येक पोत्यात १३० पाकिटे व एका पाकिटात १२ पाऊच एका पाऊचची किंमत १८ रुपये असा एकुण २६ लाख ८६ हजार ३८६ रुपयांचा अवैधरित्या साठवुन तसेच विक्रीसाठी ठेवलेले राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य गुटखा, पानमसाला पोलिसांनी हस्तगत केला आहे. घटनेप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अजय पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन अनिल काशिनाथ वाणी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोन संशयित आरोपी फरार
दोन आरोपी अद्याप फरार असुन त्यांचा शोध पाचोरा पोलिस घेत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, जितेंद्र वल्टे हे करित आहेत. या धडक कारवाईमुळे पाचोरा शहरासह परिसरातील अवैध गुटख्याची साठवुन व विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.