जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल शिवारातील वेढा बाबुळ जंगलात गावठी हातभट्टीची दारु तयार केली जाणारी भट्टी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उद्धवस्त केली. या कारवाईत १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात अवैध गावठी दारु बनविण्याच्या भट्ट्यांमध्ये वाढ होत असल्याने त्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल शिवारातील वेढाबाबुळ जंगलात हातभट्टीची गावठी दारु तयार केली जात होती. याठिकाणी छापा टाकून दारु तयार करणारे गजानन प्रकाश बेलदार (वय-४०, रा. गुरुजी कॉलनी, अंतुर्ली), जगन राजाराम भिल (वय-३५, रा. नरवेल) व राजा प्रभाकर धांडेकर (वय-१९, रा. अंतुर्ली, मुक्ताईनगर) या तिघांना अटक करण्यात आली. तसेच त्याठिकाणाहून दारु तयार केली जाणारी भट्टी उद्धवस्त करण्यात आली. याठिकाणाहून गावठी दारु बनविण्याचे साहित्यासह रसायन व तयार गावठी दारु रोख रुपये असा एकूण १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्या तिघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपुत, सहाय्यक फौजदार अनिल जाधव, अनिल देशमुख, पोलीस नाईक हेमंत पाटील, भारत पाटील यांच्या पथकाने केली.