
अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महसूल सप्ताहानिमित्त अमळनेर तालुक्यातील ब्राह्मणे येथील उत्कृष्ट पोलीस पाटील गणेश भामरे पाटील यांचा चोपडा येथे प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ५ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाला अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार प्रशांत धमके, अजय कुलकर्णी, डी.आर. सौंदाणे, आर.आर. ढोले यांच्यासह अमळनेर प्रांत कार्यालयांतर्गतचे अनेक अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, क्लार्क आणि ग्राम महसूल सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश भामरे यांनी पोलीस पाटील म्हणून आपले कर्तव्य अत्यंत चोख बजावले आहे. ब्राह्मणे परिसरातील वाळू चोरी रोखण्यासाठी त्यांनी विविध उपाययोजना राबवल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात बाम्हणे फाट्यावर धुळे-जळगाव जिल्ह्यांच्या तपासणी नाक्यावर त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने महत्त्वाची भूमिका पार पाडली. गावात निर्माण झालेल्या अनेक तणावाच्या प्रसंगी त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे ब्राह्मणे गावाने तंटामुक्त गाव म्हणून जिल्हास्तरीय दुसरा क्रमांक पटकावला. निवडणूक काळात त्यांनी गावात आदर्श मतदान केंद्र तयार करून एक वेगळा आदर्श घालून दिला.
गावातील ग्रामस्थांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. गणेश भामरे हे केवळ सामाजिक कामातच नव्हे, तर सहकार क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यांनी गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली आहे.
गणेश भामरे यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिताताई वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्यासह विविध सामाजिक आणि राजकीय स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



