जळगाव प्रतिनिधी । पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, आज पहाटे उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मयत विवाहितेच्या बहिण व भाऊ यांनी केला आहे.
सुरेखा संतोष सोनवणे (वय ३३, रा. जिजाऊनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तीचे पती संतोष सोनवणे हे एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत. सुरेखा ह्या ३१ मार्च रोजी घरात कुणीही नसतांना दुपारी २ वाजता गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेजारचांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती अत्यावस्थ होती. आज १ एप्रिल पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, सुरेखा यांच्या बहिण मनीषा अर्जुन भालेराव (रा. पालघर) व भाऊ जितेश शिरसाठ (रा. खर्दे, ता. शिरपुर) यांना ही घटना कळाल्यानंतर ते आज जळगावात दाखल झाले होते. रूग्णालयात दाखल होताच त्यांनी आक्रोश करत त्यांनी सुरेखा यांचे पती संतोष सोनवणे यांच्यावर आरोप केला. संतोष सोनवणे हा गेल्या सहा महिन्यांपासून पत्नी सुरेखाचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. तीला कोणाशीही बोलु देत नसे. गेल्या महिनाभरापासून पत्नीचा मोबाईल देखील स्वत:जवळ ठेवून घेतला होता. यामुळे ती माहेरच्या लोकांच्या संपर्कातही नव्हती. पतीच्या सततच्या त्रासामुळे कंटाळुन बहिणीने आत्महत्या केली आहे असा आरोप केला आहे. या प्रकरणात तिच्या पतीविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनीषा भालेराव व जितेश शिरसाठ यांनी केली आहे.