जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा रस्त्यावर ७ मार्च रोजी कार आडवून ७ लाख ९० हजार रूपयांची रोकडसह कार घेवून फरार होणाऱ्या संशयित आरोपी दिपक साहेबराव चव्हाण उर्फ डासमाऱ्या रा. सामनेर ता.पाचोरा याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली होती. आज १५ मार्च रोजी न्यायालयाने १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एरंडोल येथील साखरेच्या व्यापारीकडे कामाला असलेले नाना पाटील हे ७ मार्च रोजी शेंदुर्णी, सोयगाव, गोडेगाव, उडनगाव व सिल्लोड येथून साखरेची वसुली करून ७ लाख ९० हजार रूपये रोख रक्कम कार ( एम.एच. ०२ ई आर ५३८२) ने एरंडोलकडे परतत असतांना संशयित आरोपी दिपक साहेबराव चव्हाण उर्फ डासमाऱ्या रा. सामनेर ता.पाचोरा ह.मु. गिरडगाव ता. भडगाव याच्यासह अनोळखी एकाने मध्यरात्री १.१५ वाजेच्या सुमारास तालुक्यातील वावडदा गावाजवळ नाना पाटील यांच्या कारसमोर कार आडवी लावली. तसेच त्यांना कारमधून उतरवून मारहाण करत कारच्या डिक्कीत ठेवलेली ७ लाख ९० हजारांच्या रोकडसह नाना पाटील यांची कार घेवून संशितय पसार झाले होते. याप्रकरणी दुसर्या दिवशी ८ मार्च रोजी सकाळी नाना पाटील यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळ परिसरासह या मार्गावरील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना या दरोड्याच्या गुन्हयात भडगाव तालुक्यातील गिरड येथील दिपक चव्हाण यांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयिताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी १४ मार्च रोजी संशयित दिपक चव्हाण यास त्याचे गिरडगावातूनच अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील कार व रोख ४० हजाराची रोकड जप्त केली. या गुन्हयात तुकाराम दिनकर पाटील उर्फ मोघ्या यास निष्पन्न करण्यात आले. त्याचाही शोध घेणे सुरू आहे. आज न्यायालयात हजर केले असतांना संशयित आरोपीस १८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.