जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनीतील विर राम इंटरप्रायजेस कंपनी जवळून मालवाहू ट्रक लांबविल्याची घटना १ मार्च रोजी समोर आली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी शेख अजिम शेख वहाब वय २५ रा. खुबा नगर, सुप्रिम कॉलनी या संशयितास आज रविवारी दुपारी एमआयडीसी पोलिसांनी अजिंठा चौफुलीवरुन अटक केली आहे. त्यास जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास १६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मास्टर कॉलनी येथील सद्दाम हुसेन बशिर वय २९ यांच्या मालकीचा एम.एच. जे. ३३२३ हा ट्रक २६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान सुप्रिम कॉलनी परिसरातील विर राम इंटरप्रायजेस या कंपनीजवळून चोरीस गेला होता. याप्रकरणी सद्दाम बशिर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन २ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संशयिताबाबत पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंडे , इम्रान सय्यद, सुधीर साळवे , मिलिंद सोनवणे , सचिन पाटील यांच्या पथकाला सुचना केल्या. संशयित शेख अजिम शेख वहाब हा धुळे येथे पळून जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने दुपारी त्यास अजिंठा चौफुली येथून अटक केली. तपास अधिकारी सचिन मुंडे यांनी संशयित शेख अजिम यास न्यायालयात हजर केले असता, न्या. शेख यांनी संशयितास १६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ऍड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्यात मालट्रक हस्तगत करणे बाकी असून गुन्ह्यात इतर दोन संशयित फरार असून त्यांचाही एमआयडीसी पोलिसांकडून शोध सुरू आहे.