जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक शांततेत, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार आज, ३ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४ ते ६ वाजेच्या दरम्यान संपूर्ण जळगाव शहरात अचानक ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले. या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून एकूण ९६ संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अशी झाली कारवाई:
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह शनीपेठ, जळगाव शहर, रामानंदनगर आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. शहराच्या विविध भागांत राबवलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये २ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या इसमांची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून सर्वाधिक ४१, शनीपेठमधून २१, शहर पोलीस स्टेशनमधून १८ आणि रामानंदनगरमधून १६ जणांना ताब्यात घेण्यात आले.

फरार आरोपी गजाआड:
ताब्यात घेतलेल्या ९६ जणांपैकी १८ आरोपी हे न्यायालयीन समन्स आणि बेलेबल वॉरंट निघूनही न्यायालयात हजर राहत नव्हते. त्यांच्यावर विविध न्यायालयांकडून ‘नॉन बेलेबल वॉरंट’ (NBW) जारी करण्यात आले होते. पोलिसांनी या मोहिमेदरम्यान या १८ सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. उर्वरित ७८ जणांना निवडणुकीच्या काळात शांतता राखण्याची कडक समज देऊन सोडून देण्यात आले आहे.
प्रशासनाचा इशारा:
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दल यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया वेळोवेळी करणार असल्याचे संकेत जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे देण्यात आले आहेत.



