भुसावळ प्रतिनिधी । गुन्ह्यातील आरोपीकडून लाच स्वीकारतांना बाजारपेठ पोलीस स्थानकाचा कर्मचारी छोटू वैद्य याला रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरात अलीकडेच दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास आपल्याकडे असल्याचे भासवून छोटू वैद्य याने संबंधीत आरोपीकडून ४० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र संबंधीताने याविरूध्द जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार सापळा रचून आज रात्री छोटू वैद्य याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एसीबीचे उपअधिक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली. छोटू वैद्य हा अनेक प्रकरणांमध्ये आधीच वादग्रस्त ठरलेला असतांना आज अखेर एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.