मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याच्या गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या केल्यानंतर काही तासांमध्येच पाच अधिकार्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे सरकारमधील समन्वयाचा अभाव नव्याने चव्हाट्यावर आला आहे.
राज्यातील प्रमुख पोलीस अधिकार्यांच्या पदोन्नती संदर्भात गृहमंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्रालयाने बुधवारी रात्री यासंदर्भातील आदेश जारी केला होता. मात्र, अवघ्या काही तासांमध्येच काही पोलीस अधिकार्यांची पदोन्नती रोखण्यात आल्याचे समजते. गृहमंत्रालयाच्या यादीत नाव असणार्या पाच पोलीस अधिकार्यांची पदोन्नती रोखण्यात आली आहे. हे पोलीस अधिकारी मुंबई आणि ठाण्यातील असल्याचे समजते. यासंदर्भात गृहमंत्रालय किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा निर्णय घेताना सरकारी पातळीवर घातल्या जाणार्या गोंधळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृहमंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केला. मात्र १२ तासांच्या आतच यामधील पाच अधिकार्यांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. या अधिकार्यांमध्ये
राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे यांचा समावेश आहे. या सर्वांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. पत्रामध्ये गृहमंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.