कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात कार्यगौरव सोहळा उत्साहात (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तिसऱ्या नामविस्तार वर्धापनदिनानिमित्त आज बुधवार ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता कार्यगौरव सोहळा व कवी देसले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

याप्रसंगी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

वर्डी शिवारातील विमान अपघातात जखमी शिकाऊ वैमानिक अंशिका गुजर हिला दवाखान्यात नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध नसतांना अंगावरची साडी सोडून झोळी म्हणून वापरासाठी देत मानवतेचा संदेश देणाऱ्या विमलबाई हिरामण भिल यांना विद्यापीठाचा पहिला कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार या समारंभात बहाल करण्यात आला. तसेच या अपघातात मदत करणाऱ्या तेरा गावकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विमलबाई भिल यांना दिला जाणारा पुरस्कार म्हणजे दातृत्वाचा गौरव असल्याचा उल्लेख केला. बहिणाबाईंनी थेट हृदयाला भिडणारी बोली भाषा वापरली. या विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव दिल्यामुळे नावाचा गौरव आणि विद्यापीठाच्या कार्याचा विस्तार होवो अशी अपेक्षा श्री. राऊत यांनी व्यक्त केली. या विद्यापीठाने ऑन लाईन परीक्षा सुरळीत घेतल्या बद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांनी शिक्षणा व्यतिरिक्त व्यक्तीमत्व विकासाठी पुरक उपक्रमांमध्येही सहभागी व्हावे असा सल्ला दिला. तर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विद्यापीठात केला जातो या बद्दल आनंद व्यक्त करून बहिणाबाई यांचा समावेश तत्वज्ञानाच्या अभ्यासक म्हणून केला जावा अशी अपेक्षा बोलून दाखविली. ज्ञान, प्रतिभा आणि प्रज्ञेची गंगा घराघरातून या विद्यापीठामार्फत पोहचविली जावी असेही डॉ. मुंडे म्हणाले. 

या समारंभात २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षातील उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राचार्य, महाविद्यालये, शिक्षक, कर्मचारी आणि संशोधक यांच्यासह कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठात गठित करण्यात आलेल्या समिती सदस्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रा.जी.ए.उस्मानी व प्रा.आशुतोष पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी आभार मानले. यावेळी व्य.प.सदस्य प्राचार्य आर.एस.पाटील, प्रा.एस.आर.चौधरी, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य आर.पी.फालक, प्रा.मोहन पावरा, दीपक पाटील, विवेक लोहार, प्रा.जे.बी.नाईक, प्रा.मधुलिका सोनवणे, प्रा.के.एफ.पवार तसेच विजयालक्ष्मी वायुनंदन उपस्थित होते. 

 

Protected Content