कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्काराने भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान सन्मानित

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोकणातील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेला कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्काराने सन्मानित करुन उत्तर महाराष्ट्रातील विद्यापीठाने दक्षिण भागाला संवादाची साद घातली असून हा संवाद निरंतर वाढीला लागायला हवा असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु प्रा. डॉ. एन. के. ठाकरे यांनी केले.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे या वर्षाचा दिला जाणारा कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, मु. पो.झाराप, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेला शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर रोजी प्रा. ठाकरे यांच्याहस्ते देण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळयात ते बोलत होते. कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. याच समारंभात सन २०१९-२० व सन २०२०-२१ या दोन वर्षातील विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालये, प्राचार्य, शिक्षक व अधिकारी- कर्मचारी पुरस्कार देखील देण्यात आले.

विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात झालेल्या या समारंभात भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रूपये ५१ हजार, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्काराला उत्तर देतांना डॉ. प्रसाद देवधर यांनी या पुरस्काराची ५१ हजार रुपयांची रक्कम कोकणातील जिल्हा परिषद शाळेला देत असल्याचे सांगून हा पुरस्कार समाजाचा आहे असे सांगितले. धूर मुक्ततेसाठी विद्यापीठाने एखादे गाव निवडावे त्या ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी भगीरथ मार्फत मदत केली जाईल. कारण बायोगॅस घराघरात उभारणे गरजेचे आहे.  या देशात बायोगॅसची जाहिरात रस्त्यावर जेव्हा दिसेल तेव्हा इंडियातून आपण भारतात आलेलो असू असे ते म्हणाले. राजकीय व्यवस्थेकडे जायचे नाही, सरकारचा पैसा घ्यायचा नाही आणि कोणाकडेही भीक मागायची नाही ही त्रिसूत्री घेऊन भगीरथ संस्था २३ वर्षापासून उभी आहे.  ग्रामीण विकास आम्ही सोपा करुन सांगतो. एखाद्या गावातील उत्पन्न २० कोटी होईल तेव्हा कोणीही गाव सोडणार नाही असे सांगून डॉ.देवधर यांनी भविष्यात कोकणातून मनीऑर्डर जाईल असा बदल निश्चितपणे घडवणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु प्रा. ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून हे विद्यापीठ साकारले आहे असे सांगून या विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजचे आहे. त्यासोबतच आत्मचिंतनही केले पाहिजे असे मत व्यक्त केले.  कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा भगीरथ संस्थेला देत असतांना समाजाला हा भगीरथ पॅटर्न प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले. पुरस्कार प्राप्त संस्था, प्राचार्य, शिक्षक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करतांना भवतालचे बदल आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले.

प्रारंभी प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा येाजनेचा राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त स्वयंसेवक प्रतीक कदम यांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वीणा महाजन व प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले.  यावेळी मंचावर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल व वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील उपस्थित होते.

 

Protected Content